![]() |
घोणस |
दरवर्षी भारतात सर्प दंशाच्या अनेक घटना घडतात पण ग्रामीण भागात, शेतीवर काम करणा-या शेतकरी तसेच मजुरांना , विशेषकरून पावसाळयात सर्पदंश होतात. तसेच ते बहुधा पावलावर आणि थोडया प्रमाणात हातावर, विशेषतः हाताच्या पंज्यावर होतात.एकूण विषारी सर्पदंशापैकी निम्म्याहून अधिक दंश नाग व मण्यार यांचेच असतात. त्याखालोखाल फुरसे, घोणस यांचा नंबर लागतो. नाग व मण्यार ह्यांचे विष मुख्यतः मज्जासंस्थेस तर फुरसे, घोणस यांचे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस घातक असते. तर आजच्या MH 12 या ब्लॉग वर आपण घोणस आणि मण्यार या दोन विषारी सापांविषयी माहिती घेऊ..
१) घोणस
घोणस हा साप जाडसर आणि लांबीने आखूड असतो . जास्तीत जास्त चार ते पाच फूट. डोके मोठे चपटे आणि त्रिकोणी असते आणि मानेपासून ते जरा वेगळे दिसते. डोक्यावर आणि पाठीवर लहान लहान खवले असतात .घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात...शेपूट लहान असते. घोणस या सापाचे विषारी दात इतर सापांच्या तुलनेने मोठे असतात . दंश करण्यासाठी तोंड उघडल्यावर हाडांचे हालचाल होऊन विषदंत जबड्याशी काटकोनात उभे होतात आणि भक्षाच्या शरीरात विष जोरात सोडतात. उंदीर, पाल,बेडूक सरडे हे घोणसाचे खाद्य आहे .त्यामुळे ग्रामीण भागातील मनुष्य वस्तीत, शेतात तो जास्त आढळतो. घोणस सहसा माणसाच्या वाट्याला जात नाही .माणसाची अगर शत्रूची चाहूल लागतातच शरीराचे वेटोळे करून त्यात डोके दडवून बसतो. या अवस्थेत त्याचा पुढचा एक तृतीयांश भाग इंग्रजी S अक्षरासारखा दिसतो. एका क्षणात हा भाग सरळ करून तो चावा घेऊ शकतो .अत्यंत विजेच्या चपळाईने तो आक्रमण करतो. नागापेक्षाही जोरात अटॅक करतो.
विष आणि लक्षणे :
घोणसाचे विष अतिशय जहाल असते.त्याचे विष Vasculotoxic प्रकारचे आहे. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणाऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका ४ते ६ तासात मृत्यू ओढवू शकतो.
घोणस दंश केल्यास जास्त वेदना होत नाहीत त्यामुळे जर साप दिसला नसेल आणि खरंच जर तो चावला असेल तर सुरुवातीला आपल्याला सापच चावला आहे हे काही कळत सुद्धा नाही.
२) मण्यार
मण्यार ज्याला इंग्रजीमध्ये कॉमन क्रेट म्हणतात. हा भारतातील एक अत्यंत विषारी आणि दुर्मिळ असा साप आहे. हा साप काळा किंवा निळसर काळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात. मण्यारचे विष जहाल असते, म्हणजे नागापेक्षाही जास्त विषारी(नागापेक्षा जवळ जवळ १५पट जास्त) आणि धोकादायक असते . याचे विष न्युरोटॉक्सिक असते , म्हणजे याचा मज्जा संस्थेवर थेट परिणाम होतो. मण्यार हा साप निशाचर आहे, म्हणजेच तो रात्रीच्या वेळी जास्त करून सक्रिय असतो दिवसा खडक, दगडाचे ढिगारे किंवा बिळात लपून असतो. हा साप उंदीर, बेडूक आणि इतर लहान लहान सापांना खातो.
पुढील लेखात: नाग आणि फुरसे (फरुड) सापांविषयी माहिती घेऊ..
विष आणि लक्षणे:
मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
देशातील अनेक भागात उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडतात. मुख्यतः साप या प्राण्याला घाबरून माणसाचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे थोडा जरी सर्पदंश झाला आणि रक्तदाब वाढला तरी भीतीपोटी काही वेळा मृत्यू होतो. मोकळ्या जागेत मण्यार जास्त काळ थांबत नाही. अपवाद सोडून बहुतेक वेळा हा साप अडचणीच्या ठिकाणी आढळतो. हा साप खूप चपळ आहे.
विषारी साप चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहित नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे. त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये.
0 Comments