ती’ वयात येताना…! पहिलं प्रेम.. आणि मनाचा गोंधळ...!
"सोळावं वरीस धोक्याच बाई धोक्याचं"असं म्हणतात.कारण या वयात तरुण -तरुणी प्रेम ,मैत्री ई ,गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटुन जातात .या वयात ते एकमेकांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात.का तर त्यांना या गोष्टींचा फारसा अनुभव आलेला नसतो. या वयात जो स्वतः ला सावरतो तोच त्याचेच करियर उज्ज्वल होते ,नायतर भविष्याचा वाट लागतो.तर MH १ २ या ब्लॉग वर आज एक प्रसंग गोष्टीरूपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न ...
![]() |
ती' वयात येताना | पहिलं प्रेम आणि मनाचा गोंधळ |
15/16 वर्षांच्या जान्हवीच्या दप्तरात तिच्या बाबांना एका मुलाचे प्रेम पत्र सापडते.. जान्हवीचे बाबा अत्यंत काळजीत.. त्या अवस्थेत ती चिठ्ठी ते जान्हवीच्या आईला दाखवितात.. आई थोडी गंभीर होते, परंतु ही चिठ्ठी आपल्याला सापडली आहे हे जान्हवीला न कळू देण्याबाबत व तिच्याशी रोजच्या प्रमाणे वागण्याबद्दल जान्हवीच्या बाबांना विनंती करते…
आईचं हळूवार पण सत्य सांगणं:
दुसऱ्या दिवशी सकाळी, आई जान्हवीला आवडणाऱ्या गरमा गरम पोह्यांची डिश घेऊन तिच्या खोलीत जाते...
अभ्यास करत बसलेल्या जान्हवीला म्हणते; जान्हवी अभ्यास जरा बाजूला ठेव बरं..! आणि हे गरमगरम पोहे खात माझ्याशी मस्त गप्पा मार... मुलीशी गप्पा मारता मारता आई म्हणते. अगं जान्हवी...; आता आपण दोघी मैत्रिणी झालोत. जान्हवी थोडी बावचळते. अगं तू मोठी झालीस ना आता.आज तुझी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. जान्हवीच्या चेहऱ्यावर थोडे प्रश्नार्थक भाव उमटतात.
“जान्हवी, ज्याप्रमाणे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते, जसजसं आपलं वय वाढतं, त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक बदलही सुरु होतात. क्षुल्लक गोष्टींचा राग यायला लागतो, आपली चीडचीड वाढते, कधी कधी खूप उदास वाटतं, एकटं वाटतं आणि खूप रडू येतं तर कधी कारण नसतानाही उगीच हसू येतं, आणि हो कधी कधी माझा आणि बाबाचाही राग येऊ शकतो, हं तुला...! या सगळ्या बदलांबरोबरच वयात येताना अजून एक निसर्गतः मोठा बदल आपल्यात होत असतो तो म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं; एखादी व्यक्ती इतकी आवडू लागते की आपण त्या आकर्षणलाच प्रेम समजून बसतो, पण बाळा या वयात जे होतं ते फक्त आणि फक्त एक प्रकारचं आकर्षण असतं.. प्रेम नसतं..
उदा : जसं आपण एखाद्या मॉल मध्ये गेल्यावर आपल्याला एखादा ड्रेस आवडून जातो ,अगदी त्याचप्रमाणे एखादा मुलगा या वयातील मुलींना आवडू शकतो.
"बाळा, प्रेम ही वाईट गोष्ट नाही... पण प्रेमाचं वय, काळ आणि त्याची दिशा समजून घेणं महत्त्वाचं आहे. ... सध्या तू जे अनुभवतेस ते फक्त आणि फक्त आकर्षण असेल...!! भविष्यातील जबाबदाऱ्या, आयुष्याची दिशा – हे सगळं विचारात घेऊनच निर्णय घ्यायला हवेत."
कोणाला त्याचं दिसणं, आवाज, डोळे तर कोणाला त्याची स्टाईल, त्याचं बोलणं आवडतं आणि मुलांच्या बाबतीतही अगदी असंच होतं असतं. थोडक्यात हे फक्त बाह्य आकर्षण असतं.... या वयातील मुलामुलींचं शरीर व मन अजून परिपक्व झालेलं नसतं. कोणावर प्रेम करण्याइतकी प्रगल्भता म्हणजेच तर्कपूर्ण विचार करण्याची शक्ती...अजून त्यांच्यात आलेली नसते. आज एक, तर उद्या कोणी दुसरीच व्यक्ती आवडू लागते.. या वयात मनही थोडं अस्थिर आणि चंचल झालेलं असतं.. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं तेच कळत नसतं. द्विधा मनस्थिती होते.
थोडक्यात सांगायचं तर; जसं जेवणाच्या ताटात विविध पदार्थांचा समावेश असतो; अगदी तसंच आपलं आयुष्य म्हणजे जेवणाचं ताट आणि त्यातील पदार्थ म्हणजे आपले आई-वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शाळा, आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती, हे सगळे! हे सर्व आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहेत ते म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य नाही. परंतु ज्यावेळी आपण कोणा एका व्यक्तीलाच आयुष्य समजायला लागतो त्यावेळी अडचण निर्माण होते.
हे वयच खूप नाजूक असतं गं बाळा. सगळं जग या वयात सुंदर दिसत असतं ....पण त्या सुंदरतेमागचं भयाण रूप मात्र त्यावेळी दिसत नसतं.. या साठी सतत सावधान राहून या वयातील मुलांनी प्रवास केला पाहिजे, आकर्षणचा कितीही मोठा खड्डा या प्रवासात आला तरी तो चुकवून पुढे जाणंच फायद्याचं असतं. आकर्षणात अडकणं हा आपल्या ध्येयामधील खूप मोठा अडथळा असतो.
तो अडथळा आपल्या मार्गात येऊ नं देता आपण पुढं जाणं गरजेचं असतं.
सत्याचे भान आणि जागृती :
आपल्या आईचं हे सगळं बोलणं ऐकून जान्हवीला रडू आवरत नाही. ती उठून आईला कडकडून मीठी मारते आणि खोलीत जाऊन आपल्या दप्तरातून ती चिठ्ठी आणून आईला दाखवत म्हणते; आई मी ही या खड्ड्यात पडणार होते गं; पण तू वाचवलंस मला.. आता कितीही मोठे खड्डे आले तरी मी ते सहज पार करू शकेन . कारण आता या प्रवासात मी एकटी नाही तू ही आहेस माझ्याबरोबर..आई ही तिला जवळ घेऊन....आपण तिच्या बरोबर असल्याचा विश्वास तिला स्पर्शाने देते...
What's App ग्रुप जॉईन करण्यासाठी https://chat.whatsapp.com/ByY5m3MIQi182aWVHVaDvB?mode=r_c वर क्लिक करा.
वयात आलेल्या प्रत्येक मुलांच्या पालकांचा त्यांच्याशी अत्यंत मोकळेपणाचा संवाद असणे गरजेचे असते.. या संवादाच्या अभावामुळेच बहुतांशी वयात आलेली मुले आणि मुली ही चुकीच्या दिशेने वाहवत जाण्याची शक्यता असते.. अनेक शंका, उत्सुकता यांनी त्यांना घेरून टाकलेले असते. त्यामुळे त्यांच्या शकांचे निरसन हे पालकांमार्फत योग्य पद्धतीने झाल्यास मुले त्यांचा किशोर अवस्था म्हणजेच Teenage मधील प्रवास नक्कीच हसत खेळत पार करू शकतील..
For More Posts Click Here :
إرسال تعليق